उल्हासनगर पालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी शासनाला फसवले

उल्हासनगर पालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी शासनाला फसवले

शासकीय नोकरीसाठी जन्म दाखल्यात फेरफार; गुन्हा दाखल

मूळ जन्म तारीख ही १ जून १९७२ असताना शासकीय नोकरी मिळवण्यासाठी कॉलेजच्या मार्फत जन्मदाखल्यात १ जून १९७० अशा फेरफारीचा ठपका ठेवण्यात आलेल्या उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर आज शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी युवराज भदाणे यांनी त्यांच्या मूळ जन्म तारखेत फेरफार करून पालिकेत नोकरी मिळवल्याची तक्रार पुराव्यानिशी पालिकेकडे केली होती.त्यानुसार आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या निर्देशानुसार भदाणे यांच्या सेवा पुस्तकात नोंदवलेली १ जून १९७२ ही जन्मतारीख कोणत्या आधारावरून नोंदवली गेली त्याची सत्यता पडताळणी करण्याबाबत चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती.

समितीने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता.त्यात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थांच्या अभिलेखात भदाणे यांची जन्म तारीख ही १ जून १९७० ही नोंद आहे.असे असताना शाळा सोडल्याचा दाखला महात्मा गांधी शाळेचा दर्शवून आर.के.तलरेजा महाविद्यालयामार्फत त्यात फेरफार करून चुकीची १ जून १९७२ अशी जन्मतारीख नमूद करून वयोमर्यादित बसत असल्याचे दर्शवून महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका समितीने ठेवला होता.

हे ही वाचा:

‘लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाचा निर्णय मागे घ्या!’

भारताच्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने विश्वविजेत्या कार्लसनला नमवले

मध्य प्रदेशात २०२३ला काँग्रेसची ठरणार का शेवटची निवडणूक?

सव्वाशे कोटी झाला खर्च, पण पालिकेचा सायकल ट्रॅक अर्धवट

 

त्यामुळे युवराज भदाणे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा शासकीय प्रस्ताव मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महासभे समोर ठेवला होता.तो मंजूर करण्यात आल्याने आज मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सामान्य प्रशासनाचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर शासनाची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून भदाणे यांना अटक करण्यात येणार असे सांगितले.

Exit mobile version