ईडीकडून ठाण्यातील ११ सदनिका सील
शिवसेनेच्या विविध नेत्यांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता हळूहळू त्यांचा मोर्चा ठाकरे कुटुंबियांकडे वळतो आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे.
श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली असून त्यांच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.
सकाळपासून ईडीने हे धाडसत्र सुरू केले असून मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याचीच संपत्ती जप्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ६.४५ कोटींची ही मालमत्ता असून त्यावर ईडीने टाच आणली आहे. ११ फ्लॅटच्या स्वरूपात ही संपत्ती जप्त केली आहे.
पुष्पक बुलियन प्रकरणात ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. ठाण्यात ही कारवाई सकाळपासून सुरू होती. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून या सदनिका उभारण्यात आल्या होत्या असे समोर येते आहे. या कंपनीत पुष्पक बुलियन प्रकरणातून पैसे गुंतवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीवर पीएमएलए अंतर्गत आरोप होते. मनीलॉंड्रिंगसंदर्भात २०१७पासून तपास सुरू होता.यासंदर्भात महेश पटेल, चंद्रकांत पटेल, नंदकिशोर चतुर्वेदी यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या संपत्तीवरही टाच आणली होती. पाटणकरांचे यांच्याशी व्यवहार असल्याचे म्हटले जाते. त्यावेळी ईडीने २० कोटी ७७ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ठाण्यातील मालमत्ता. ईडीची कारवाई पाहता पाटणकरांची भूमिका काय याची विचारणा होत आहे.
हे ही वाचा:
आशिष शेलार यांच्या आग्रही मागणीनंतर अकृषी कराला स्थगिती
उ.प्र.मध्ये सपाला उभारी देण्यासाठी अखिलेश आणि आझम खान यांनी खासदारकी सोडली
गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीचा गोरक्षकांनी केला पर्दाफाश
ओसीविरहित इमारतींना जादा दराने पाणीपुरवठा नको! अकृषक कायद्यालाही द्या स्थगिती
यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंचे जे घोटाळेबाज आहेत, त्यांची वसुली ही थांबणार नाही. या घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरे असो की त्यांचे मंत्री असो की त्यांचे मेहुणा असो. किती कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केले होते, कुठल्या ठाकरेंच्या खात्यात जमा झाले ते समोर येईल. आगे आगे देखो होता है क्या!
यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातील आहेत. ही कारवाई राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेली आहे. आम्ही झुकवू शकतो, नमवू शकतो, हे दाखविण्यासाठी या कारवाया महाराष्ट्रातच नाहीत तर जिथे भाजपा सत्ता नाही तिथे केली जात आहे.