विषप्रयोग करून २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

गडचिरोलीतील घटना; दोन महिलांना अटक

विषप्रयोग करून २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा २० दिवसांमध्ये रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. पोलिसांनी तपास केला असता, यात याच कुटुंबातील दोन महिलांचा हात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या दोघांना बुधवारी अटक केली. संघमित्रा असे एका महिलेचे नाव असून ती तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर नाराज असल्याने तिने हे कृत्य केले. तर, रोझादेखील मालमत्तेच्या वादातून त्यांच्यावर नाखूष होती, असे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही महिलांनी कुटुंबीयांना मारण्यासाठी आर्सेनिक हे विष वापरले. हे विष म्हणजे रंगहीन, गंधहीन आणि बेचव असा जड धातू असतो.

 

२० सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया यांना विषबाधेची लक्षणे जाणवली. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला आणि हळूहळू विष अंगात भिनत गेल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना सुरुवातीला अहेरी येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे आणि नंतर नागपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. शंकर कुंभारे यांचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. तर, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असताना त्यांची मुले कोमल दहागावकर आणि आनंदा या मुली आणि मुलगा रोशन कुंभारे यांनादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. कोमल हिचा ८ ऑक्टोबर रोजी, आनंदा हिचा १४ ऑक्टोबर रोजी तर रोशन याचा त्याच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.

हे ही वाचा:

गाझा पट्टीला १० कोटी अमेरिकी डॉलरच्या मदतीची बायडेन यांची घोषणा

इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी राष्ट्रपतींच्या गावी पोहचणार रेल्वे

एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

आपल्या कुटुंबीयांच्या मृत्यूची माहिती कळताच शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर तातडीने दिल्लीतून चंद्रपूरला आला होता. मात्र घरी परतल्यानंतर त्याचीही तब्येत बिघडली. कुभारे यांचा चालक राकेश माडवी, ज्यांनी शंकर आणि विजया यांना चंद्रपूरला रुग्णालयात नेले होते, त्याचीही तब्येत खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये कुंभारे कुटुबांची भेट घेणारा एक नातेवाईकही आजारी पडला आणि त्याच्यावर उपचार करावे लागले. आता या तिघांचीही प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

 

‘रोझा रामटेके ही विजया कुंभारे यांची भावजय. ती जवळच्याच घरात राहात होती. तिच्या पतीच्या आई-वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीवरून शंकर कुंभारे यांची पत्नी व बहिणींसोबत तिचे मतभेद होते. त्यामुळे संघमित्रा आणि रोझा यांनी संगनमताने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी या संपूर्ण कुटुंबाला मारण्यासाठी ऑनलाइनच विषासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली. विष घेण्यासाठी रोझा रामटेके तेलंगणाला गेली होती. तेथून तिने हे पाण्यात किंवा अन्नपदार्थात मिसळूनही समजू न शकणारे विष आणले होते. शंकर कुंभारे आणि त्यांच्या पत्नीला चंद्रपूरमधील रुग्णालयात नेत असतानाही ते बाटलीमधील पाणी प्यायले होते. तेव्हा रोझा हिने त्यांना याच्यात आयुर्वेदिक पाने असल्याचे सांगितले होते. तेव्हा कुंभारे याच्या चालकानेही त्यातील थोडे पाणी प्यायले होते आणि तो आजारी पडला होता.

Exit mobile version