जम्मू- काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश हाती आले आहे. उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये गुरुवारपासून दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू होती. ही चकमक शुक्रवारीही चालूच होती. दरम्यान, या चकमकीमध्ये लपून बसलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे.
शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा एकदा सोपोर परिसरात गोळीबार सुरू झाला होता. यावेळी सोपोरच्या सगीपोरा गावात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्थान घातले आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ने या संदर्भातील माहिती दिली आहे.
Kashmir Zone Police tweets, "Two terrorists have been neutralised in Sopore encounter. Identification & affiliation is being ascertained. Incriminating materials, arms & ammunition recovered. Further details shall follow." pic.twitter.com/vCrRdhhgVB
— ANI (@ANI) November 8, 2024
सोपोर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती हाती लागताच सुरक्षा दलांनी सोपोरच्या सागीपोरा भागात मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई सोपोर पोलीस आणि २२ राष्ट्रीय रायफल्स यांच्या संयुक्त पथकाकडून केली जात होती. दरम्यान, या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सैन्याने त्यांना चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हटवले होते. गुप्त माहितीच्या आधारे लष्कराने परिसरात शोध मोहीम राबवली. गुरुवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला होता. अखेर शुक्रवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन ग्रामरक्षकांची हत्या
राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?
राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!
दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी ग्राम संरक्षण गटाच्या (व्हीडीजी) दोन सदस्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या ‘काश्मीर टायगर्स’ या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.