जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त

जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नौशेरा भागात गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसले होते. रविवार, ८ सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही दहशतवाद्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सध्या या भागात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कराने ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री लाम आणि नौशेरा येथील नागरी भागात घुसखोरीविरोधी कारवाई सुरू केली होती. या कारवाई दरम्यान लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. व्हाईट नाइट कॉर्प्सने याविषयी माहिती दिली आहे. काही कागदपत्रेही हाती लागली असून यावर तपास सुरू आहे. परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. शोधमोहीमही सुरू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या सीमेवर आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील लाम भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत भारतीय लष्कराला अलर्ट दिला होता. या इशाऱ्याच्या आधारे भारतीय लष्कराने या भागात कडक गस्त सुरू केली. रविवार-सोमवारच्या मध्यरात्री काही दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी त्यांना आव्हान दिले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू- काश्मीर निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहे.

Exit mobile version