काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या सुरू असलेल्या कारवायांना रोखण्यासाठी भारतीय सैन्याकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली असून ती आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान शोपियांमध्ये द्रागड भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सैन्याला यश आले आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार दोन दहशतवाद्यांना ठार केले असून त्यांची ओळख अजून पटलेली नाही. अजूनही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. काश्मीरमध्ये सध्या वातावरण गंभीर असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन दिवसांपूर्वी बैठका घेऊन दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी एक विशेष टीम दिल्लीहून जम्मू- काश्मीरला पाठवली होती. त्यानंतर या शोध मोहिमेला अधिक वेग आला असून ही आजवरची सर्वात मोठी शोध मोहीम आहे.
#UPDATE | Two unidentified terrorists killed in Dragad area of Shopian during an encounter. Search operation is underway: J&K Police
— ANI (@ANI) October 20, 2021
काश्मीर बाहेरच्या नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी त्यांना लक्ष्य करण्यास दहशतवाद्यांनी सुरू केले आहे. आतापर्यंत टार्गेट किलिंगमध्ये ११ बिगर काश्मिरी नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या दहशतीमुळे अनेक नागरिकांनी पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. दहशतीला आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यानेही मोठी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेसाठी आणि कारवाईसाठी सैन्याने पुंछ आणि राजोरीमधील घनदाट जंगलाला वेढा घातला आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, अशा सूचना करण्यात सैन्याकडून करण्यात येत आहेत.
स्थानिकांचा फायदा घेत आणि त्यांच्या आडून दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात लोकांना मशिदीच्या भोंग्यावरून सूचना करत घरातच थांबण्यास सांगितले आहे. खाण्या- पिण्याच्या वस्तूंचा साठा करून ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मानवी शरीरात बसविली डुकराची किडनी; काय आहे संशोधन?
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
पुंछ आणि राजोरी भागात ही मोहीम सुरू असून या भागात डोंगराळ प्रदेश आणि घनदाट जंगल असल्याने दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण भागाला सैन्याने वेढा दिला आहे. पॅरा कमांडर आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या चकमकीत भारताच्या नऊ जवानांना वीरमरण आले आहे.