सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी मोठी कारवाई केली आहे. श्रीनगरच्या झाकुरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी शुक्रवारी या कारवाईची माहिती दिली. दहशतवाद्यांकडून दोन पिस्तुल आणि अन्य काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

श्रीनगर पोलिस आणि सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा (LET) आणि हिजबुल मुजाहीद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या या चकमकीत इकलाख हजम हा दहशतवादी मारला गेला. तर हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी उमर इश्फाक मलिक उर्फ ​​मुसा मारला गेल्याचे वृत्त आहे.

शोपियानच्या नदीगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी यंत्रणा घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.

हे ही वाचा:

१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक

दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी

मुंबईतील उद्यानाला ‘ख्वाजा गरीब नवाज’ नाव दिल्याने वाद

अभिनेते किरण माने यांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

नुकतीच २९ जानेवारी रोजी बडगाम जिल्ह्यातील चरार ए शरीफ आणि पुलवामा जिल्ह्यात नायरा इथे सुरक्षा दलाने शोधमोहिम राबवली होती. यावेळी बडगाममध्ये एक आणि पुलवामात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. अशाप्रकारे १२ तासांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Exit mobile version