दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने मुलुंडमधील एका महिलेला चोरट्यांनी लुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलुंडमधील एका महिलेचे दागिने आणि रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुलुंड पश्चिममधील गणेश गावडे रोडवरील एका इमारतीमध्ये दोन तरुण शिरले. त्यांनी या इमारतीमध्ये राहणाऱ्या महिलेच्या घराचे दार ठोकले. महिलेचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांचा मुलगा व्यायामशाळेत गेला होता. महिलेने दार उघडताच दोन्ही तरुणांचे लक्ष महिलेच्या हातामधील बांगड्यांवर गेले आणि त्यांनी कमी पैशांत दागिन्यांना चमकवून देतो, असे सांगून त्यांना बांगड्या काढायला लावल्या. बांगड्यांना पॉलिश करता करता कानातील बुटीदेखील काढायला लावल्या. दोन्ही दागिने घेतल्यानंतर त्यांनी महिलेकडे पाणी मागितले. महिलेचा विश्वास बसल्याने दोघेही निर्धास्त झाले.
हे ही वाचा:
लसीचा एक डोस घेतलात तरी तुम्ही सुरक्षित
पालकच म्हणू लागले शाळा सुरू करा!
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
तरुणांनी पैसे घेताना सुट्ट्या पैशांची मागणी केली आणि तेव्हा ही महिला ४० हजार रुपयांमधून सुट्टे पैसे देत असताना चोरट्यांनी हातचलाखीने सर्व रक्कम काढून घेतली. सर्व रक्कम हाती आल्यावर त्यांनी महिलेकडे पुन्हा पाणी मागितले. महिला पाणी आणायला जाताच दोघेही तरुण सोसायटीमधून पसार झाले. महिलेने पाणी आणल्यानंतर दोघेही दरवाजात दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सोसायटी परिसरात धाव घेतली आणि तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.
ही घटना महिलेने पतीला सांगितल्यावर त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली. ५० हजार रुपयांचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड एवढा ऐवज चोरट्यांनी लांबवला. दोन्हीही चोरट्यांनी मास्क घातला असल्यामुळे त्यांना ओळखणे मुश्कील आहे.