स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर पश्चिम येथील शाखेत आलेल्या दरोडेखोरांपैकी एकाचा बूट बँकेच्या आवारात पोलिसांना मिळाला होता. या बुटांच्या वासामुळे मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाने दरोडेखोरांचा माग काढत दरोडेखोर लपून बसलेल्या घराचा शोध घेण्यात आला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने त्या घराचा ताबा घेत दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दार आतून घट्ट बंद केल्यामुळे तसेच कोणी दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी बळाचा वापर करून दार तोडून आत प्रवेश केला असता दोन आरोपीपैकी एक जण घरात लपून बसला होता.
पोलिसांनी जागेवरच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच परिसरात लपून बसलेल्या दुसऱ्या दरोडेखोराला अटक करण्यात आली. विकास यादव आणि धर्मेंद्र यादव असे या दोघांची नावे असून दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पश्चिम उपनगरातील दहिसर पश्चिमेतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत आलेल्या दोन तरुणांनी बँकेतील कर्मचाऱ्यावर गोळीबार करून अडीच लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती.
या गोळीबारामध्ये एक कंत्राटी कर्मचारी ठार झाला होता तर एक जण जखमी झाला. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या एमएचबी पोलिसांनी दोन अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी संपूर्ण मुंबईत नाकाबंदी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
वंडरलँडला २ जानेवारीपर्यंत ठोकले टाळे
‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी
‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध
दहिसर पश्चिमेतील एमएचबी कॉलनी परिसरातील एस व्ही रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दुपारी ३.२६ च्या सुमारास दोन शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. दोघांनीही तोंडाला मास्क लावलेले होते, त्यांच्यापैकी एकाने बँकेच्या कॅशियरकडे पिस्तूल रोखून पैशांची मागणी केली. त्यानंतर बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या संदेश गोमारे या कर्मचाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यात गोमारे आणि आणखी एक कर्मचारी जखमी होताच या दरोडेखोरांनी कॅश काउंटरवरून अडीच लाख रुपयाची रोकड घेऊन पळ काढला.