राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेदी यांच्या हत्येप्रकरणी राजस्थानच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सुखदेव सिंह यांची तिघा अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती.
राजस्थान पोलिसांनी स्टेशन हाऊस ऑफिसर मनीष गुप्ता आणि कॉन्स्टेबल महेश यांना बुधवारी निलंबित केले. गोगामेदी यांची मंगळवारी, त्यांच्या राहत्या घरी हत्या केली होती. घरात घुसलेले मारेकरी त्यांच्याकडील पिस्तुलाने समोरील सोफ्यावर बसलेल्या गोगामेदी यांच्यावर अगदी जवळून अंधाधुंद गोळीबार करत असल्याचे घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे. या तिघा मारेकऱ्यांपैकी एक मारेकरी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मारला गेला. तर, अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
हे ही वाचा:
नवाब मलिक अजित पवारांच्या वर्गात शेवटच्या बाकावर?
लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!
राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा
पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांची ओळख पटवली आहे. त्यातील एकाचे नाव रोहित राठोड असून तो माकराना नागौर येथील राहणारा असून दुसऱ्याचे नाव नितीन फौजी आहे. तो हरयाणा येथील महेंद्रगठ येथील रहिवासी आहे. करणीसेनाप्रमुखाच्या हत्येनंतर संघटनेच्या हजारो सदस्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदोर, जबलपूर येथेही निदर्शने करण्यात आली. भोपाळमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्तेही बंद केले होते.