बसची वाट पहात उभे असणाऱ्या दोन प्रवाशांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी सायन येथील एव्हरार्ड नगर येथे घडली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून एकाची ओळख पटली आहे. दुसऱ्याची ओळख पटवण्याची काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघातानंतर कार सोडून पळून गेलेल्या चालकाचा कसून शोध घेण्यात येत आहे. बाबासाहेब काळे (५५) असे ओळख पटलेल्या एका मृताचे नाव असून चेंबूर येथील वाशीनाका येथे राहण्यास आहे. तर दुसऱ्या मृताचे वय ६० असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
बाबासाहेब काळे हे चुनाभट्टी येथील मनपाच्या पंप हाऊस या ठिकाणी कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काळे हे रात्रपाळी करून घरी जाण्यासाठी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील एव्हरार्ड नगर बस स्टॉपवर बसची वाट पहात उभे होते. त्याच्यासोबत आणखी काही प्रवासी वाट बसची वाट पहात असताना सायनच्या दिशेहून एक भरधाव वेगाने असेन्ट ही मोटार कार ठाण्याच्या दिशेने जात असताना या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार बसस्टॉपवर उभे असणाऱ्या दोघांना धडक देत पुढे निघून गेली.
या अपघाताची माहिती मिळताच चुनाभट्टी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चुनाभट्टी पोलिसांना अपघाताची माहिती देत जखमींना तातडीने सायन रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले.
हे ही वाचा:
अरेरे !! थ्रेशर मशीनमध्ये युवकाचा पाय अडकला आणि…
पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शोवर या तारखेपर्यंत बंदी
म्हणून किया कंपनीने लाखो कार परत मागवल्या!
हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम
घटनास्थळी दाखल झालेल्या चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत असताना काही अंतरावर अपघातग्रस्त असेन्ट कार पोलिसांना मिळून आली मात्र त्यातील चालक पळून गेला होता. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन कार चालकाचा शोध सुरू केला आहे. दरम्यान चुनाभट्टी पोलिसांनी बाबासाहेब काळे याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला असून दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्याची काम सुरु असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली आहे.