आयएसआयच्या संपर्कात असलेल्या दोघांना जोगेश्वरीतून अटक

महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसची संयुक्त कारवाई

आयएसआयच्या संपर्कात असलेल्या दोघांना जोगेश्वरीतून अटक

महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबईतील जोगेश्वरी येथून सय्यद अरमान आणि मोहम्मद सलमान सिद्धीकी या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. अरमान हा पाक स्थित आयएसआय या दहशतवादी संघटनेसाठी तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी तयार करीत होता अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या रईस याच्या चौकशीत बाहेर आली होती. एटीएसने अटक केलेल्या सय्यद अरमान आणि सलमान या दोघांना अटक करून ट्रान्झिस्ट रिमांड वर उत्तर प्रदेशात नेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी एटीएसने रविवारी संशयित आयएसआय एजंट रईस याला उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती, त्याच्या चौकशीत मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारे संशयित सय्यद अरमान (६२) आणि मोहम्मद सलमान सिद्धिक (२४ ) यांची नावे समोर आली. सोमवारी उत्तर प्रदेश एटीएसचे पथक मुंबईत दाखल झाले होते, त्यांनी मुंबई एटीएसची मदत घेऊन जुहू येथील एटीएस युनिटच्या अधिकारी यांच्यासह जोगेश्वरी येथे सर्च ऑपरेशन हाती घेऊन सय्यद अरमान आणि मोहम्मद सलमान सिद्धीकी या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांना ट्रान्झिट रिमांड अंतर्गत उत्तर प्रदेशात नेण्यात आले, असे महाराष्ट्र एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अरमान हा एका पाकस्थित आयएसआय एजंटच्या संपर्कात होता, त्याने रईसला उत्तर प्रदेशातील लष्करी प्रतिष्ठानांची तपासणी करण्यासाठी आणि पाकिस्तान मधील हँडलरला माहिती पुरवण्यासाठी भरती केले होते. अरमान जोगेश्वरीमध्ये चहाचा स्टॉल चालवतो तर त्याच परिसरात सलमानचे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. अरमान रईसला आर्थिक मदत करत होता आणि त्याने त्याला अनेक वेळा पैसे पाठवले असल्याचे उत्तर प्रदेश एटीएसच्या चौकशीत समोर आले होते.

मुंबईत लहानाचा मोठा झालेला अरमान हा पाकस्थित आयएसआय एजंटच्या संपर्कात आला होता आणि त्याने गुप्तपणे आयएसआय साठी काम करण्यास सुरुवात केली होती. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेला रईस हा वर्षभरापूर्वी मुंबईत आला होता व त्याला दुबई येथे नोकरीसाठी जायचे होते त्यासाठी तो अरमानच्या घरी मुक्कामाला होता. अरमान याने रईसला पैसे कमविण्यासाठी दुबईला जाण्यापेक्षा येथून बक्कळ पैसा कमविण्याचा सल्ला देत त्याला भारताच्या लष्करी आस्थापनांची माहिती गोळा करण्याचा प्रस्ताव रईस समोर ठेवला.

रईसने पैशासाठी अरमानचा प्रस्ताव मंजूर केला आणि उत्तर प्रदेशला निघून गेला होता. त्यानंतर त्याला एका हुसैनी नावाच्या व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला होता, त्याने त्याला संरक्षण आस्थापनांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते, असेही चौकशीत समोर आले आहे. अरमानने काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशला भेट दिली होती आणि कॅन्टोन्मेंट भागांची माहिती गोळा केली होती आणि तो त्याच्या पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार

स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी शिंपलाकृती इमारत

छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार 

उत्तर प्रदेश एटीएसने रईसवर पाळत ठेवून त्याला पकडले होते. चौकशीदरम्यान, रईसने अरमानचे नाव उघड केले, ज्याने त्याला आपल्या पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात आणले होते. पाकिस्तानातून आलेले पैसे अरमानकडे आले, त्यांनी ते रईसला दिले. रईसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरमान हा मुंबईतील जोगेश्वरी येथे असल्याची माहिती मिळाली आणि महाराष्ट्र एटीएसला सतर्क करण्यात आले. त्यानुसार जुहू एटीएस युनिटने अरमान आणि सलमानला अटक केली.

Exit mobile version