जम्मू आणि काश्मीरमध्ये बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पंजाबमधील एक रहिवासी ठार तर अन्य एक जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अमृतपाल सिंग असे असून तो पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी होता. तर, दुसऱ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दहशतवाद्यांनी श्रीननगरमधील शाहीद गुंज येथे गोळीबार केला. ‘ हब्बा कडाल येथील शाल्ला कडाल परिसरात संध्याकाळी सात वाजता ब्लॅक रेंजच्या एके रायफलने केलेल्या हल्ल्यात अमृतसरमधील अमृतपाल सिंग या व्यक्तीचा मृत्यू झाला,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सिंग यांनी घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला तर, अन्य कामगार २५ वर्षाचा तरुण रोहित याला जबर जखमा झाल्या आहेत. रोहित हादेखील अमृतसरचा रहिवासी आहे. रोहित याला पोटात गोळ्या लागल्या आहेत आणि त्याच्यावर एसएमएचएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
एनडीएचे घटकपक्ष वाढवण्यात भाजपचा पुढाकार!
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन अधिकारी याच्याविरुद्ध लाचेचा गुन्हा दाखल
सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे ‘सायबर कमांडो’
या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. येथे कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या मागावर आहेत.