महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भाग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात गुरुवार, १३ मे रोजी सकाळी सी ६० पोलिस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दोन माओवाद्यांना कंठस्नान घातले गेल्याची माहिती मिळत आहे.
धानोरा तालुक्यातील मोरचुल जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सावरगांव पोलीस मदत केंद्राअंतर्गत हा भाग येतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या नक्षलवाद्यांची धरपकड करण्याचे ठरवले त्यासाठी योजना आखण्यात आली. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सी ६० पोलिस दलाच्या जवानांनी गुरुवारी सकाळी सर्च ऑपरेशन सुरु केले. सकाळी ७ च्या सुमारास ही शोध मोहीम सुरु झाली.
हे ही वाचा:
मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?
इलॉन मस्कचा बिटकॉइनवरही परिणाम
मेट्रोची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस
‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द
हे सर्च ऑपरेशन सुरु असतानाच जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलिसांनीही या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनीही नक्षलींवर गोळीबार सुरु केला. सुमारे तासभर ही धुमश्चक्री सुरु होती. पोलिसांचा दबाव वाढत होता. माओवाद्यांवर ते हावी होत होते. अखेर जंगलाचा फायदा घेत माओवाद्यांनी तिथून पळ काढला. या नंतर पोलिसांनी आपले सर्च ऑपरेशन आणखीन तीव्र केले तर त्यांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.