आज देशभरात होळी साजरी केली जात आहे. मात्र उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युपीमधील अमेठीमध्ये होळीचा रंग लावण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी इतकी टोकाला गेली की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
अमेठी जिल्ह्यातील बाबुपूर गावात आज दुपारी तरुण गट करून होळी खेळत होते. यादरम्यान रंग लावण्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाला, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या तरुणांनी इतकी भीषण हाणामारी केली की, यामध्ये दोन तरुणांना जीव गमवावा लागला. आणि ६ सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दोन जण गंभीर जखमी असल्यामुळे स्थानिक रुग्णालयातून जखमींना ट्रॉमा सेंटर लखनऊमध्ये पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी खेळण्यावरून दोन बाजूंमध्ये झालेल्या हाणामारीत अखंड प्रताप सिंग (३२) आणि शिवराम उर्फ क्लड्डू पासी (५५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या मृतांमधील अखंड प्रताप सिंग यांचा जुना गुन्हेगारी इतिहास आहे.
हे ही वाचा:
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा
२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला
२०२४ ला होणार नवरा विरुद्ध बायको लढत
घटनास्थळी तणावाचे वातावरण पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीएम राकेश कुमार मिश्रा आणि एसपी दिनेश सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. स्थानिक अध्यक्ष जामो यांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात डीएम राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेचा पूर्ण तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.