पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या मुलीचा ऑनलाईन लैंगिक छळ करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे.
पाचवीत शिकणाऱ्या या मुलीला या दोघांनी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून अश्लील चित्रफिती पाठवून तिलाही तिच्या नग्नावस्थेतील चित्रफिती पाठवण्यासाठी धमकी दिली होती. अजय म्हात्रे आणि सनी जानीयानी अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
सध्या ऑनलाईन शाळा असल्यामुळे या मुलीला घरच्यांनी शिक्षणासाठी मोबाईल दिला होता. स्नॅपचॅट या अॅपच्या माध्यमातून आरोपींनी मुलीचा नंबर मिळवला. मुलगी ऑनलाईन शिक्षण घेत असताना एके दिवशी सनीने तिच्या क्रमांकावर स्वतःची अश्लील छायाचित्रे आणि काही चित्रफिती पाठवल्या. त्यानंतर सनीने मुलीचा नंबर अजयला दिला. त्यानेही मुलीला स्वतःच्या अश्लील चित्रफिती पाठवल्या आणि मुलीला तिच्या चित्रफिती पाठविण्यास सांगितले. मुलीने नकार देताच त्यांनी तिच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या धमकीच्या भीतीने तिने तिच्या चित्रफिती त्यांना पाठवल्या, असा आरोप आहे.
हे ही वाचा:
पॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या ‘योद्ध्या’ची कहाणी
काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला
अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट
अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!
मुलगी अस्वस्थ असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. मुलीला अधिक विचारले असता हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर त्वरित मेघवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार करण्यात आली. अजय आणि सनी दोन्ही आरोपींच्या भिवंडी येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींवर लैंगिक छळ, माहिती तंत्रज्ञान आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मुले वापरत असलेले अॅप्स तसेच खेळांचे अॅप्स पालकांनी तपासायला हवेत. काही चुकीचे आढळ्यास त्याबद्दल त्वरित पोलीस ठाण्यात कळवायला हवे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.