नवीन कपडे खरेदी करण्यावरून वडिलांशी वाद झाल्याने घरातील दोन मुले तब्बल पाच लाख रुपये रोख चोरी करून नांदेड येथून मुंबईला पळून आले होते. मात्र काही तासातच या मुलांना उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांच्या विशेष पथकाने मालाड परिसरातून सुखरूप ताब्यात घेतले आहे. रोख रुपयांसह दोन्ही मुलांचा ताबा नांदेड ग्रामीण पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
घरच्यांशी झालेल्या क्षुल्लक वादातून या दोन्ही मुलांनी पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलांना मुंबईत मौजमजा करायची होती म्हणून या मुलांनी थेट नांदेडहुन ट्रेनने मुंबई गाठली. अशी माहिती मुलांची चौकशी केल्यावर समोर आली आहे.
पंधरा वर्षाचा मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. दोन दिवसांपूर्वी हा मुलगा कोणालाही न सांगता घरातून गायब झाला, उशिरापर्यंत तो घरी आला नाही म्हणून त्याच्या पालकांनी शोध सुरु केला. तेव्हा असे समोर आले की, त्याच्यासोबत आणखी एक मुलगा गायब झाल्याचे तेव्हा समोर आले. एकाच दिवशी दोन मुले गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली मग त्या दोन्ही मुलांच्या पालकांनी नांदेड ग्रामीण पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलांचा तपास करायला सुरवात केली. पोलिसांनी सोशल मीडियावरही हरवल्याची माहिती दिली.
हे ही वाचा:
राजस्थानमध्ये वऱ्हाडाच्या कारला अपघात…नवरदेवासह नऊ जण ठार
आपल्या गाडीसमोर पु्न्हा पुन्हा बाईकस्वार कसा आडवा येतो?
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
दरम्यान, मुंबईत आल्यानंतर त्या मुलांनी आयफोन खरेदी केला आणि सिमकार्ड टाकून फोने चालू केला. त्यामुळे त्यांचे लोकेशन शोधून त्यांना शोधण्यास आणखी सोपे गेले. त्यावेळी त्यांचे लोकेशन मुंबईतील मालाड परिसरात दिसून आले. त्यानंतर नांदेड पोलिसांनी सायबर सेल पोलिसांना ही माहिती देऊन शोध घेण्यास सांगितले. मुंबई पोलिसांनी मालाड आणि आसपासच्या परिसरात या मुलांचा शोध सुरु केला. आणि काही तासांतच या मुलांचा शोध लागला आणि त्यांना सुखरूप नांदेड पोलीसांत सोपवण्यात आले.