झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) मध्ये अपात्र ठरलेल्या झोपडया पात्र करण्यासाठी एका झोपडपट्टी दादाने थेट अंडरवर्ल्डची मदत घेतल्याचा प्रकार मुंबईतील पश्चिम उपनगरात उघडकीस आला आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा टोळीचा गँगस्टर छोटा शकील याचा भाऊ अन्वर याने बांधकाम व्यवसायिकाला आंतरराष्ट्रीय कॉल करून धमकावल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे.
शेख अरबाज नईम आणि राजू उर्फ कामरान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जोगेश्वरी येथील एक झोपडपट्टीत एसआरएची योजना राबवण्यात येत आहे. या झोपडपट्टीत अरबाज याच्या ६ खोल्या असून त्यापैकी पाच खोल्या एसआरएने अपात्र ठरवल्या असून १ झोपडी पात्र ठरवली आहेत, अपात्र ठरवलेल्या खोल्या देखील पात्र ठरवून त्यामोबदल्यात ६ फ्लॅट पाहिजे, अशी मागणी अरबाज याने बांधकाम व्यवसायिकाला केली होती. मात्र या खोल्या एसआरए ने अपात्र ठरवलेल्या असल्याचे बांधकाम व्यवसायिकाने सांगितले.
अखेर अरबाजने राजू उर्फ कामरान याला मध्यस्थी टाकले. राजू उर्फ कामरान हा छोटा शकील याचा भाऊ अन्वर याच्या संपर्कात असल्यामुळे त्याने अरबाज सोबत अन्वरशी फोनवर बोलणे करून दिले. त्यानंतर त्याच्या आपसात व्यवहार ठरला. त्यानंतर अन्वर याने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून बांधकाम व्यवसायिकाला छोटा शकीलचा भाऊ बोलत असल्याचे सांगत अरबाजच्या सर्व झोपड्या पात्र ठरवून त्याला मोबदल्यात ६ घरे देण्यात यावी तसेच मला देखील माझा वाटा पाहिजे, असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हे ही वाचा:
मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस
रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकाने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आणि पथकाने करून अरबाज आणि राजू उर्फ कामरान या दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्वर हा परदेशात दडून बसला असून छोटा शकीलच्या नावाखाली तो मुंबईत खंडण्या वसूल करीत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.