दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत वसई येथून ड्रग्ज जप्त केले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटच्या पथकाने वसई या ठिकाणी केलेल्या कारवाईत ५ कोटी १७ लाख रुपये किंमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी अमीन मोहम्मद अख्तर (४६) आणि छोटा मोहम्मद नासिर (४०) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अख्तर आणि नासिर हे दोघेही वसई तालुक्यातील पेल्हार गावात भाड्याच्या घरात राहत होते. हे दोघे मूळचे उत्तराखंड राज्यातील एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. या दोघांकडे राजस्थानमधून आलेल्या बुटांच्या पार्सलमधून हेरॉईन आणण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या पथकाने शुक्रवारी वसई येथील पेल्हार गावातील एका घरात छापा टाकून अख्तर आणि नासिर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ किलो ७६० ग्राम हेरॉईन जप्त केले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५ कोटी १७ लाख रुपये किंमत आहे.
हे ही वाचा:
स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी
फिरकीसमोर वेस्ट इंडीजने गुडघे टेकले; हजाराव्या सामन्यात भारताचा दमदार विजय
….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर
लता दीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मागील वर्षभरापासून हे या ड्रग्सच्या व्यवसायात असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा राजस्थानमधून होत असल्याचे समोर आले आहे. राजस्थान येथून नवीन बुटाच्या सोलमधून या ड्रग्सची तस्करी करून हे बूट या दोघापर्यंत पोहचवले जात होते. त्यानंतर हे दोघे या ड्रग्सची विक्री मुंबई, ठाणे परिसरातील किरकोळ ड्रग्स विक्रेत्यांना पुरवत होते, अशी माहिती मिळाली आहे. याप्रकरणी या दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.