भारतीय रिझर्व्ह बँक, वित्त मंत्रालय आणि परदेशी बँकांची बोगस कागदपत्रे तयार करून श्रीमंताची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दुकलीला मुंबई गुन्हे शाखेने एका पंचतारांकित हॉटेल मधून अटक केली आहे. या दुकलीने एका महिलेची ५० लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रयत्न केला मात्र वेळीच ही दुकली पकडल्या गेल्यामुळे या महिलेचे ५०लाख रुपये वाचले.
प्रसाद बोलपती आणि विनेश विश्वनाथ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. प्रसाद हा आंध्रप्रदेश राज्यातील तर विश्वनाथ हा बंगळुरू येथील राहणारा आहे. पोलिसांनी या दोघांजवळ सापडलेल्या बॅगेत भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालय, भारतीय शासकीय कार्यालय आणि परदेशी बँकांचे बोगस दस्तावेज सापडले. काही दिवसांपूर्वी हे दोघे सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेला भेटले होते. आम्ही दोघे एका कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे सांगून त्यांनी त्या महिलेला सांगितले की, त्यांच्या कंपनीला ८० कोटी रुपयांचा एज्युकेशन फंड आलेला असून ही रक्कम रिझर्व्ह बँकेत आहे.
८० कोटी रुपयांचा फंड मिळावा यासाठी अधिकारी ५० लाख रुपयांची मागणी करीत आहेत, असे सांगून बोगस कागदपत्रे या तक्रारदार महिलेला दाखवले. तुम्ही आम्हाला आता सध्या ५० लाख रूपयांची मदत केल्यास फंड रिलीज होताच तुम्हाला ७ कोटी रुपये देऊ असे आमीष त्यांनी या महिलेला दाखविले.
हे ही वाचा:
पोरांच्या शाळा सुरू करा हो आता!
रामटेकमध्येच महाकवी कालिदासांच्या पदरी उपेक्षा!
मुलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले?
अखेर केंद्र सरकारसमोर ट्विटरला बनावे लागले ‘विनय’शील
सात कोटीच्या आमीषापोटी या महिलेने त्यांना पैसे देण्याचे कबूल केले. मात्र थोडा वेळ द्या, असे सांगून आगाऊ ५० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम घेण्यासाठी या महिलेने घाटकोपर येथील एका हॉटल मध्ये दोघांना बोलावले होते. त्याच दरम्यान या महिलेची एका मित्राशी भेट झाली आणि तिने या पैशांबाबत या मित्राला सांगितले. तेव्हा त्या मित्राने तिला सावध करून असा कुठलाही फंड वैगरे नसतो तुमची फसवणूक करण्यात येत असल्याचे सांगितले.
दरम्यान, मित्राने आणि महिलेने मिळून ही माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना दिली. श्रीधनकर यांनी पथकासह सापळा रचून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना गुन्हे शाखेत आणले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात पोलिसांना बोगस कागदपत्रे मिळून आली. पोलिसांनी या दोघांकडे कसून चौकशी केली असता या दोघांचे बिंग फुटले. हे दोघे सराईत भामटे असून या दोघांविरुद्ध दिल्ली आणि इतर राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे.