डी गॅंग कनेक्शनसंदर्भात एनआयएकडून दोघांना अटक

डी गॅंग कनेक्शनसंदर्भात एनआयएकडून दोघांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सध्या डी गॅंगशी जवळीक असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उठवला आहे. काही दिवसांपूर्वीच एनआयच्या पथकाने मुंबई आणि उपनगरांत छापेमारी केली होती. त्यानंतर एनआयएच्या पथकाने गुरुवार, १२ मे रोजी दोघांना अटक केली आहे. आरिफ शेख (५९) आणि शब्बीर शेख (५१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. डी गॅंगशी संबंध असल्याच्या संदर्भात या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आरिफ शेख आणि शब्बीर शेख हे मुंबईतील ओशिवारा येथील रहिवाशी आहेत. फरार आरोपी छोटा शकील आणि दाऊदशी संबंध असण्याच्या आरोपाखाली या दोघांना करण्यात आली आहे. छोटा शकीलाच्या इशाऱ्यावर हे दोघे डी कंपनीसाठी मुंबईतून दहशतवाद्याना आर्थिक रसद पुरवत असल्याचे समोर आले आहे. एनआयए काही दिवसांपासून सुरू केलेल्या डी कंपनी विरोधातील सुरू केलेल्या कारवाईतील ही पहिली अटक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तान मधून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे सिंडिकेट चालविणारा तसेच खंडणी, ड्रग्स तस्करी, दशतवादी कृत्यात सामील असणाऱ्या दाऊद चा हस्तक छोटा शकील याच्या विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. या दोघांनाही एनआयए न्यायालयात हजर करणार आहे.

सोमवार, ९ मे रोजी सकाळीच एनआयएने कारवाईला सुरुवात केली होती. डी कंपनीसंबंधी एनआयएकडून  मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुंबईतील बोरिवली, मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, सांताक्रूझ, भेंडी बाजार या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर ही कारवाई करण्यात आली.

या दरम्यान, ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा साथीदार आणि मुंबईतील माहिम, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी आणि छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला एनआयएने ताब्यात घेतले होते. एनआयएचे पथक गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे १८ जणांची चौकशी करत होते. दरम्यान, माहीम दर्गा ट्रस्टी सुहेल खांडवानी, सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, गुड्डी पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, अजय गोसालिया, कय्युम शेख, समीर हिंगोरे यांना चौकशीनंतर सोडण्यात आले.

हे ही वाचा:

औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी झुकले

मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

ग्यानव्यापीचा सर्वे होणारच! वाराणसी न्यायालयाचा फैसला

…आणि अयुब पटेलशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले!

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, इकबाल मिर्ची, जावेद चिकना आणि इतर लोकांसोबत दाऊदने आपले हातपाय पसरले होते. भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती एनआयएने दिली असून त्या पार्श्वभूमिवरच कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version