ठाणे येथील कोलशेत भागातील बेपत्ता असलेले कंत्राटदार हनुमंत शेळके यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या करून त्यांच्याकडील पाच ते सात तोळे दागिने, तसेच १० हजार रुपये काढून घेत नंतर त्यांचा मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्या हत्येनंतर आरोपींचा आणखी खंडणी मागण्याचा बेत होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहेत.
पेंटिंग कंत्राटदार हनुमंत शेळके १ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजता कोलशेत नाका येथे एका आजारी कामगारास पैसे देण्याकरिता घरातून बाहेर पडले. नंतर ते घरी परतले नाही म्हणून कापूरबावडी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवण्यात आली.
शेळके यांचा शोध सुरू असताना शेळके यांचे व्यावसायिक भागीदार संतोष पाटील यांना ६ सप्टेंबरला शेळके यांच्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी फोन आला. शेळके यांना सोडून देण्याच्या मोबदल्यात १५ लाख मागण्यात आले. फोनबद्दल पोलिसांना कळवताच पोलिसांनी शोधासाठी पथके स्थापन केली. तांत्रिक तपासाच्या आधारे शिवा वर्मा आणि सूरज वर्मा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली, असे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी
तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा
चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
दोघांना अटक केल्यावर तीन जण फरार आहेत. तीनही फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींपैकी दोन मुख्य आरोपी हे शेळके यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होते. पैशाच्या उदेशाने आरोपींनी शेळके यांची १ सप्टेंबरलाच हत्या करून मृतदेह कोलशेत येथील खालचा गावात निर्जनस्थळी पुरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.