राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून बारावीचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शनिवारी झालेल्या १२ वीचा रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमधील पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव मुकेश यादव असे आहे. कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. विले पार्लेतील साठ्ये महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी
दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी
‘द काश्मीर फाइल्स’ देशातील प्रमुख शहरांत हाऊसफुल्ल!
दुसरीकडे नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS) हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजीचा पेपर फुटला असल्याचे समोर आले. मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना देण्यात आली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.