अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या

पोलिसांकडून आरोपीला अटक

अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे. शिर्डीच्या सावळीविहीर  गावात ही घटना घडली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तर हल्ल्यात सासरे, सासू आणि मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या कुटुंबियांशी अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. दरम्यान बुधवार, २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारास रागाच्या भरात आरोपी सुरेश निकम याने पत्नीच्या घरात घुसून कुटुंबीयांवर वार केले. या हल्ल्यात पत्नी (वर्षा सुरेश निकम; वय २४ वर्षे), मेहुणा (रोहित चांगदेव गायकवाड; २५ वर्षे), आजे सासू (हिराबाई द्रौपद गायकवाड; ७० वर्षे) जागीच ठार झाल्या. तर, यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. मात्र, तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मृत वर्षा सुरेश निकम यांची भावजई श्वेता गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अचानक आरोपी सुरेश निकम घरी आले. घराचा दरवाजा उघडताच त्याने लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला.

हे ही वाचा:

शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !

सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ

आता खिचडी घोटाळ्यात गजानन कीर्तिकरांच्या मुलाचे नाव !

खालिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नूकडून भारतीयांना धमकी

आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून त्याने हत्या केल्याची माहिती आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्या आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version