तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

संदेशखालीमधील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांतील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहान याला अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. तो गेल्या ५५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

५३ वर्षीय शेख शहाजहान याला उत्तर २४ परगणा येथील मिनाखान परिसरातून उचलण्यात आले. त्याला आता न्यायालयासमोर सादर केले जाईल. शेख शहाजहान याला अटक होत नसल्याबाबत कोलकाता उच्च न्यायालयाने तीन दिवसांपूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याला अटक झालीच पाहिजे, असे उच्च न्यायालयाने नमूद केले होते. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. संदेशखालीतील मोठ्या संख्येतील महिलांनी शहाजहान शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांवर त्यांची जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी येथे एक महिन्याहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे.

भाजपने सातत्याने आंदोलन केल्यानेच ममता बॅनर्जी सरकारला कारवाई करावी लागली, असा दावा पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी शेख शहाजहान याच्या अटकेनंतर केला आहे.

‘सरकार अजूनही सर्व काही नाकारण्याच्या मनस्थितीतच आहे. असे काही घडले असेल, हेदेखील ते स्वीकारत नाहीत. शेख शहाजहान याला अटक करायलाच लावू, हे आम्ही आधीच सांगितले होते. भाजपच्या आणि संदेशखालीतील महिलांच्या आंदोलनामुळेच ममता बॅनर्जी आणि सरकारला शेख शहाजहान याला अटक करावी लागली,’ असे अधिकारी म्हणाले.

हे ही वाचा:

जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले

पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पॅकेज पोहोचण्याआधी लुटले जायचे!

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

५ जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी शहाजहान याला अटक करण्यासाठी आले असता, जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्या दिवसापासून तो फरार होता. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे शहाजहान आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध जमीन बळकावणे आणि लैंगिक अत्याचाराच्या ५० तक्रारी नोंद झाल्या आहेत. तर, राज्य सरकारकडे एक हजार २५० तक्रारी आल्या असून त्यातील ४०० जमीन प्रकरणातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version