मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मित्राने सेक्स रॅकेट मध्ये अडकवल्यामुळे पोलीस अटक करतील या भीतीने २७ वर्षीय तरुणाने हाताची नस कापुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथे उघडकीस आली आहे.
तन्मय केणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वडाळ्यातील प्रतीक्षा नगर मध्ये राहणारा तन्मय केणी हा वडाळा टिटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका सेक्स रॅकेटच्या गुन्ह्यात कथितरित्या अडकला होता. या गुन्ह्यात त्याचा मित्र सचिन करंजेला वडाळा टिटी पोलिसांनी २० दिवसांपूर्वी अटक केली होती, करंजेच्या चौकशीत तन्मय केणीचे नाव समोर आले होते.
हे ही वाचा:
कुर्ल्याप्रमाणे घाटकोपर मध्ये भरधाव टेम्पो बाजारात घुसला
बांगलादेश भारताकडून तांदूळ आयात करणार
मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न : १३ विद्यार्थ्यांना अटक
१७ डिसेंबर रोजी वडाळा टिटी पोलिसांनी तन्मयला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते, तन्मय पोलीस ठाण्यात गेला परंतु आपल्याला अटक करतील या भीतीने त्याने तेथून पळ काढला.तेव्हापासून तन्मय हा बेपत्ता झाला होता, त्याचा मोबाईल फोन सुद्धा बंद झाला होता.
२६ डिसेंबर रोजी तन्मय केणी हा मुलुंड पश्चिम छेडा पेट्रोलपंप येथे बेशुद्ध अवस्थेत मुलुंड पोलिसांना आढळून आला होता. त्याच्या हातावरील नस कापण्यात आली होती. पोलिसांनी त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुलुंड पोलिसांना तन्मयकडे जी चिठ्ठठी सापडली, त्यात त्याने सचिन करंजे याच्या नावाचा उल्लेख केला होता. “सचिन याने मला फसवले असून तो मला ब्लॅकमेल करत आहे त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. त्याला फाशी झाली पाहिजे. सॉरी मम्मी पप्पा” असे सुसाईड नोट मध्ये तन्मय याने नमूद केले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात सचिन करंजे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन हा तन्मय केणी याचे आधार कार्ड वापरून मुलींना लॉज घेऊन जात होता व मुलींचे त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता. सचिन याच्याविरुद्ध वडाळा टिटी आणि माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून वडाळा टिटी पोलिसांच्या अटकेत असलेल्या सचिनचा ताबा माटुंगा पोलिसांनी घेतला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सचिन हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून लवकरच त्याचा ताबा मुलुंड पोलीस ठाणे घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.