राज्यामध्ये लवकरच आता नवीन केंद्रीय वाहतुकीचे नियम लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळेच चालकांनी आता जरा हे गंभीरपणे घ्यायला हवे. सुधारीत कायद्यानुसार आता नियम मोडणाऱ्या चालकांना खिसा रिता करावा लागणार आहे. नवीन मोटार वाहन कायदा आता राज्यसरकार लवकरच लागू करणार आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर बेशिस्त वाहनचालकांसह, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण राखणे शक्य होणार आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने हा कायदा लागू केला होता. मात्र, तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यात सुधारणा करून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणुका सुरु झाल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी रखडली होती. तेव्हापासून हा कायदा अडगळीत पडला होता. प्रदूषणाच्या तरतुदी वगळता अन्य तरतुदी, ज्यात अधिक पटीने दंडाची तरतूद केली आहे, यात योग्य तो बदल करण्यात येईल. कायदा लागू होताना लोकांना त्रास होणार नाही, याचा विचार करूनच नवीन तरतुदी राज्यात लागू होतील, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात.
या सुधारित कायद्यानुसार वेगाने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये व त्याहून अधिक किंवा तीन महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. नव्या सुधारणांमुळे नियम कडक झाले आहेत. सध्याच्या घडीला वाढते अपघात आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी परिवहन विभाग आग्रही आहे.
हे ही वाचा:
मेहबुबांची मुफ्तीफळे; म्हणे आर्यन मुस्लिम असल्याने होतेय कारवाई
काय आहे मोदी सरकारने सुरु केलेली आयएसपीए?
‘या’ भारतीय बंदरात आता पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणला बंदी
सर्वसामान्यांकडून विरोध होत असल्याचे कारण पुढे करत तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याताल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेच आता नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास सध्याचा एक हजार रुपये असलेला दंड पाच हजार रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहन चालविल्यास सध्या तीन हजार रुपये असलेला दंड दहा हजार रुपये, परवान नसतानाही वाहन चालविल्यास ५०० रुपये असलेला दंड पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.