पैशाच्या भ्रष्टाचाराला पैसे खाणे असे म्हटले जात असले तरी मध्य प्रदेशात अशा एका भ्रष्ट अधिकाऱ्याने खरोखच पैसे ‘खाल्ले’. मध्य प्रदेशातील कटनी येथील एक लाचखोर तलाठी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. मात्र लोकायुक्त पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या तलाठ्याने चक्क लाचेची रक्कमच गिळल्याचे समोर आले आहे.
लोकायुक्त पोलिसांचे पथक लाचखोर तलाठ्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कटनीच्या राजेंद्र सिंह या तलाठ्याने लोकायुक्तांच्या विशेष पोलिसांच्या पथकाला पाहून त्याला मिळालेली लाचखोरीची रक्कम गिळली. राजेंद्र सिंह हा त्याच्या कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. तेव्हा ही घटना घडली, अशी माहिती लोकायुक्त पोलिस अधीक्षक संजय साहू यांनी दिली.
हे ही वाचा:
इर्शाळवाडी दुर्घटनेत पोरक्या झालेल्या मुलांना हवाय भावनिक आधार
पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!
टँकरमधून आरडीएक्स नेत असल्याचा खोटा फोन करणारा अटकेत
न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
बरखेडा गावातील एका व्यक्तीने लोकायुक्त पोलिसांकडे राजेंद्र सिंह हा लाच मागत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता. त्या व्यक्तीकडून लाच घेतल्यानंतर राजेंद्र सिंह याने लोकायुक्त पोलिसांच्या पथकाला पाहिले आणि कारवाई होऊ नये, यासाठी ते पैसेच गिळून टाकले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.