गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे मिळणारी शिक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्याने स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव रचल्याची घटना हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे घडली. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची आणखी चौकशी केली तेव्हा मुलाने या अपहरणाच्या बनावाची कबुली दिली.
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाने गृहपाठ पूर्ण केला नव्हता. त्यामुळे त्याला शिक्षा होईल, या भीतीने त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. या घटनेची नोंद येथील कोट पोलिस ठाण्यात करण्यात आली. ‘दोन मास्कधारी तरुण माझ्याजवळ आले आणि मला एका पदार्थाचा वास हुंगायला दिला. त्यामुळे मी बेशुद्ध झालो. त्यानंतर त्यांनी मोटारसायकलवरून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूककोंडीत दुचाकी थांबली असताना मला अचानक शुद्ध आली. तेव्हा अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून मी पळून गेलो,’ असे मुलाने त्याच्या कुटुंबीयांना सांगितले होते.
हे ही वाचा:
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा
सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ३७० बाबत कपिल सिब्बल यांची तासमपट्टी
‘जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबाराची घटना बघून आली कसाबची आठवण’
औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधानसभेत नितेश राणे विरुद्ध अबू आझमी
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती लगेचच पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना मुलाची कथा रचलेली असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता, त्याने गृहपाठ पूर्ण केला नसल्याने होणारी शिक्षा टाळण्यासाठी ही खोटी कथा रचल्याचे कबूल केले.
महिनाभराच्या पावसाळी सुट्टीनंतर हिमाचल प्रदेशातील शाळा ३१ जुलै रोजी पुन्हा सुरू झाल्या आहेत.