देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून शनिवारी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशातच पश्चिम बंगालमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका तृणमूल काँग्रेसच्या म्हणजेच टीएमसीच्या नेत्याची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. तमलूक लोकसभा मतदारसंघातील महिषादलमध्ये टीएमसी नेत्यावर हल्ला करण्यात आला आणि नंतर त्यांना तलावात फेकण्यात आले. शेख मैबुल असे या नेत्याचे नाव आहे.
मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजेच शुक्रवारी मिदनापुर जिल्ह्यातील महिषादल येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान टीएमसी नेत्याची हत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या नेत्याचे नाव शेख मैबुल आहे. ते माजी ग्राम पंचायत सदस्य होते. तृणमूलचे नेते शेख मैबुल यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, शेख रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. तेव्हा वाटेत अनेकांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जवळच्या तलावात फेकून दिले. लोकांना समजल्यावर मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा:
आता व्हीआयपींनाही राम मंदिरात फोन नेण्यास बंदी
नुपूर शर्मांच्या हत्येचा कट: मौलवी सोहेलच्या अटकेनंतर आणखी दहशतवादी पकडले
हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा
त्यांनी निभावला रोल बाकीच्यांचे फक्त झोल
यापूर्वी २२ मे रोजीही अशीच हिंसाचाराची घटना नंदीग्राममध्ये घडली होती. भाजपाच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आले होते. हत्येविरोधात नंदीग्राममध्ये निदर्शनेही करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, शनिवारी मतदानाच्या सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील आठ जागांचा समावेश आहे.