पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने ही मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या मारहाणीच्या घटनेवेळी जवळपास २०० लोकांचा जमाव होता. या जमावासमोर एका पुरुषाला आणि महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारण्यात आलं. यावरून भाजपाने आणि सीपीआय या पक्षांनी तृणमूलवर निशाणा साधला आहे. तर हा प्रकार समर्थनीय नसल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.
पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे २८ जून रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत या दोघांच्या विवाह्यबाह्य संबंधाविषयी चर्चा सुरू होती. याचवेळी या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडीओमध्ये दोघांना मारहाण करत दिसणाऱ्या या व्यक्तीची ओळख तजमुल असून तो उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा येथील स्थानिक टीएमसी नेता आहे. त्याला या परिसरात जेसीबी म्हणूनही ओळखलं जातं. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ताजिमूल इस्लामला पोलिसांनी अटक केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय त्यानुसार, आजूबाजूला घोळका जमला आहे. घोळक्याच्या मध्ये या जोडप्याला एक काळा टीशर्ट घातलेला व्यक्ती बेदम मारहाण करत आहे. या प्रकरणातील पीडित इतके घाबरले होते, की त्यांनी स्वतःहून पोलीस तक्रार करणं टाळलं. परंतु, सोशल मीडियावरील व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
“बंगालमध्ये तालिबान राजवट निर्माण झाली असून टीएमसीच्या एका कार्यकर्त्याने एका पुरुष आणि महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण करणारा व्यक्ती हा टीएमसी आमदाराचा समर्थक आहे. याप्रकरणात प्रशासन आणि पोलीस कुठेच दिसत नाहीत,” अशी टीका केंद्रातील राज्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी केली आहे.
हे ही वाचा:
… म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच
देशभरात लागू झाले नवे तीन फौजदारी कायदे
पंतप्रधानांची जनतेशी पुन्हा ‘मन की बात’
आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?
“मारहाण करण्यात आलेल्या स्त्री आणि पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. हे परिसरातील लोकांना अमान्य होतं. म्हणून साळिशी सभा घेण्यात आली होती. परंतु, ताजिमुलने जे केलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याच्याही भूमिकेची चौकशी करणार आहोत,” अशी भूमिका टीएमसीने घेतली आहे. शिवाय तजमुल हा टीएमसी नेता नसल्याचे पक्षाने म्हटलं आहे.