‘जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे’ असे धक्कादायक स्टेटस वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सऍपला ठेवले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये वाझे यांच्याभोवती संशयाचे वादळ निर्माण झाले आहे. अशातच सचिन वाझे यांच्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे चर्चांना उधाण आले आहे.
सचिन वाझेंनी नेमके काय म्हटले आहे?
शनिवारी एपीआय सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सऍपला एक स्टेटस ठेवल्याचे आढळून आले. या स्टेटसमध्ये वाझे म्हणतात,
“३ मार्च २००४ ला माझ्या सीआयडी मधील सहकाऱ्यांनीच मला एका खोट्या केसमध्ये अटक केली. आजही ती अटक अनिश्चित आहे. हाच इतिहास पुन्हा घडणार असे वाटत आहे. माझे सहकारी अधिकारी मला चुकीच्या पद्धतीने अडकवू पाहत आहेत. आजच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. तेव्हा माझ्याकडे आशेची, संयमाची, आयुष्याची आणि नोकरीची १७ वर्ष होती. पण आज माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना नोकरीची आहेत, ना जगण्याच्या संयमाची आहेत. मला असे वाटते की जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे.”
हे ही वाचा:
रेखा जरे प्रकरणातील सुत्रधार ताब्यात
युएनमध्ये भारताची चकली डिप्लोमसी
शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये
सचिन वाझे यांना या स्टेटसच्या माध्यमातून नेमके काय सांगायचे आहे यावर चर्चा सुरु झाली आहे. वाझे यांच्या अंतरिम जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून वाझे यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. १९ मार्च रोजी वाझे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. अंबानींच्या घराबाहेरची गाडी आणि मनसुख हिरेन या दोन्ही प्रकरणात नाव आल्यामुळे वाझे यांच्यावर बदलीची नामुष्की ओढवली आहे. शनिवारी वाझे जबाब नोंदवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या (एनआयए) च्या कार्यालयात हजर झाले.