दिल्ली न्यायालयात २०२१ मध्ये दुसर्या गुंडाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या टिल्लू ताजपुरियाची मंगळवारी उच्च सुरक्षा तुरुंगात भोसकून हत्या करण्यात आली.दिल्लीच्या तिहार तुरुंगात प्राणघातक हल्ल्यावेळी पोलिस बघ्याच्या भूमिकेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. ताजपुरियाला पोलीस घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याला पुन्हा मारहाण केली आणि तेव्हाही पोलिस फक्त बघतच राहिल्याचे धक्कादायक फुटेज मिळाले आहे. या हत्येप्रकरणी आता १० पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
तिहार तुरुंगातील नवीन सीसीटीव्ही फुटेज तुरुंगातील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचार्यांच्या वर्तणुकीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. टिल्लू ताजपुरियाला भोसकल्यानंतरही तुरुंगातील कैद्यांकडून मारहाण सुरूच होती. प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी सुमारे ९० वेळा टिल्लूवर वार केले त्यानंतर दोन माणसे अचानक टिल्लू ताजपुरियावर पुन्हा हल्ला करतात पण त्यांना रोखण्याचा पोलिस अजिबात प्रयत्न करत नाहीत. उलट मरण पावलेल्या माणसाला मारताना पाहून पोलीस मागे हटताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!
सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा
इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती
‘दहशतवादी उद्योगाचे प्रवक्ते’, जयशंकर यांनी बिलावलना सुनावले
हा भीषण हल्ला पाहणारे सुरक्षा कर्मचारी तिहार येथे तैनात असलेल्या तामिळनाडू विशेष पोलिस दलाचे होते. या घटनेनंतर एका सहाय्यक अधीक्षकासह नऊ अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती आली आहे. एका सूत्राने सांगितले की टि्ल्लूची हत्या करणाऱ्यांनी पोलिसांना इशारा दिला की त्यांनी हस्तक्षेप केल्यास त्यांना देखील दुखापत होऊ शकते. विशेष कक्ष आता या घटनेचा तपास करत आहे. ताजपुरिया याला दोन आठवड्यांपूर्वीच मंडोली तुरुंगातून तिहारला हलवण्यात आले होते. हल्लेखोरांना कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आले होते तर ताजपुरिया तळमजल्यावर होता.
हल्लेखोरांनी काही कालावधीत प्रथम सुरक्षा ग्रील्स कापले आणि नंतर पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी आणि ताजपुरियावर हल्ला करण्यासाठी बेडशीटचा वापर केला होता.महिनाभरात तिहार तुरुंगात हिंसाचार आणि टोळी विरोधाची ही दुसरी घटना आहे.गेल्या महिन्यात, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी प्रिन्स तेवतिया याची प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी तिहार तुरुंगात हत्या केली होती. बिश्नोई हा गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येतील आरोपी आहे.