बस,ट्रेन,रिक्षा आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करून मुंबईत शहरात धुमाकूळ घालणाऱ्या तीन महिलांना अखेर कांदिवली पूर्वेतून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघीजणी एकमेकींच्या जाऊबाई आहेत. या तिघी जाऊबाईंनी मागील काही महिन्यात मुंबईतील पूर्व पश्चिम उपनगरात चोऱ्यांचा सपाटा लावला होता. कांदिवली पूर्वेत राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.
या महिलेने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळ तसेच इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासाले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन महिला संशयास्पद हालचाल करीत असल्याचे तपास अधिकारी यांच्या लक्षात आले. पोलिसांनी या सीसीटीव्हीवरून अधिकतोस केला असता या तिघी भांडुपच्या दिशेने जात असल्याचे इतर सीसीटीव्ही फुटेजवरून समजले.
तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज चा माग घेत घेत भांडुप परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात या तिघी चोरी करताना आढळून आल्या. या तिघीचा शोध घेऊन भांडुप खिंडीपाडा परिसरातून या तिघींना ताब्यात घेण्यात आले. अनुसया चंद्रकांत गायकवाड (५५), मारक्का उर्फ मारुबाई लक्ष्मण गायकवाड (५०), बेबी रामू गायकवाड (५२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघींची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता या तिघींनी गुन्ह्याची कबुली दिली.
हे ही वाचा:
सिंधुदुर्गाहून पहिले विमान ‘या’ तारखेला झेपावणार
…म्हणून जम्मू-काश्मीरमधील सहा कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ
मुंबई वगळता सर्व महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग
कोरोनाग्रस्त कुटुंबियांना मोदी सरकार देणार ५० हजार रुपये
या तिघी एकमेकींच्या जाऊबाई असून तिघांचे पती एकमेकांचे सख्खे भाऊ असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या तिन्ही जावांवर मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. या तिघी गर्दीचे ठिकाण, बस, रिक्षा ट्रेन बसथांबा या ठिकाणी महिलांच्या पर्समधून मोबाईल फोन दागिने व इतर व महागड्या वस्तूची चोरी करीत होत्या. तसेच ज्या दुकानात गर्दी असेल त्या ठिकाणी देखील या तिघी महिलांच्या पर्स, मोबाईल लांबवत होत्या, अशी माहिती समता नगर पोलीसानी दिली आहे.