पुण्यातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, दोन तरुणांच्या धाडसी कृत्यामुळे तरुणीचा जीव वाचला असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले. मात्र, जिथे ही धक्कादायक घटना घडली तिथे जवळच पोलीस ठाणे असूनही पोलिसांकडून कारवाई व्हायला बराच वेळ लागल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर या हल्ला प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार, २८ जून रोजी रात्री जारी करण्यात आले आहेत.
पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली. दरम्यान, आरोपी शंतनू जाधव या तरुणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सध्या त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा:
चुकीच्या तथ्यांसह ‘कुराण’वर डॉक्युमेंटरी बनवा, बघा काय होते ते
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य मानाचे वारकरी
रहिवासी संकुलांमध्ये बकऱ्यांची कत्तल करण्यास मनाई
टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?
पुण्यातील सदाशिव पेठेतमधील पेरुगेट पोलीस ठाण्याजवळ मंगळवारी (दि. २७) सकाळी दहाच्या सुमारास एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली. प्रेमसंबंधांसाठी नकार दिल्याच्या कारणावरून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या तरुणाला अटक केली. परंतु, पेरूगेट पोलrस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी गैरहजर होते. दोन तरुणांच्या धाडसामुळे तरुणीचा जीव वाचला.