केंद्र सरकारने ‘नक्षल मुक्त भारत अभियान’ सुरू केले असून याअंतर्गत सुरक्षा दलांकडून नक्षलग्रस्त भागांमध्ये कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकींमध्ये ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारच्या झीरो टॉलरन्स भूमिकेचा पुनरुच्चार केला. शिवाय ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवार, २५ मार्च रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये ३० नक्षलवाद्यांना ठार मारल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा सुरक्षा दलाला यश आले आहे.
Security Forces have gunned down three naxals in an encounter that took place today in the Dantewada district of Chhattisgarh.
— ANI (@ANI) March 25, 2025
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान दंतेवाडा- विजापूर सीमेवरील जंगलात सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोळीबार झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. यानंतर ही चकमक सुरू होती. सध्या घटनास्थळावरून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह, काही शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. संबंधित परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा..
पाकिस्तानने काबीज केलेली काश्मीरची जमीन सोडावी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू- काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकला भारताने सुनावले
धारावी सिलेंडर स्फोटांनी हादरली; रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधील सिलेंडरमध्ये स्फोट
कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
या चकमकीसह, २०२५ मध्ये छत्तीसगडच्या विविध भागात झालेल्या चकमकीत १०० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. या वर्षी १ मार्चपर्यंत सुमारे ८३ नक्षलवादी मारले गेले होते. उल्लेखनीय म्हणजे, २०२४ मध्ये छत्तीसगडमध्ये २०० हून अधिक नक्षलवादी मारले गेले होते.