बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. पंजाबमधून यांना अटक करण्यात आली आहे.
टार्गेट किलिंगची योजना आखल्याप्रकरणी आणि सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या नेमबाजांना मदत केल्याप्रकरणी चंदीगड पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंदीगडच्या दादुमाजरा कॉलनीतून रविंदर सिंग आणि पंजाबच्या फाजिल्का येथून जावेद झिंझा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीनंतर मोहाली-रहिवासी करण कपूरला अटक करण्यात आली आहे.
चंदीगडमध्ये बिश्नोई आणि लकी पटियाल टोळीचे सदस्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या तिघांचा माग काढत होते. ते मोबाईल ऍप्सद्वारे संवाद साधून अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते. अबोहर आणि भटिंडा येथील बिश्नोईचा बॅचमेट असलेल्या झिंझाने अवैध निधी व्यवस्थापित केला आणि चंदीगड, पंजाबमधील तरुणांना त्याच्या नेटवर्कमध्ये सामील होण्याचे आमिष दाखवले, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. झिंझाचा जवळचा सहकारी रविंद्रने त्याला पैसे उकळण्यात मदत केल्याचा आरोप आहे. तर करण कपूर त्याच्या घरातून बेकायदेशीर इमिग्रेशन व्यवसाय चालवतो.
हे ही वाचा:
काशी-मथुराच्या मशिदींवरील दावा मुस्लिमांनी सोडावा!
निक्की हेली यांची ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी!
शशी थरूर यांच्या सहायकांना विमानतळावर अटक
तरुण अभिनेत्रीचा मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू विरुद्ध बलात्काराचा गुन्हा
सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिश्नोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.