मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात एका धावत्या वाहनात बॉम्बस्फोट झाला असून त्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बॉम्बस्फोट झाल्यानंतर आरोपींनी अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.
माहितीनुसार, मणिपुरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता येथील पुलावरून जात असलेल्या एका कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता मणिपूर पोलीस, आसाम रायफल्स आणि अन्य तपास यंत्रणांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी क्वाक्ता परिसरातील सीसीटीव्ही फूटेज चेक करण्यास सुरुवात केली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मणिपुरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारांच्या घटनेत आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. हजारो लोकांना घर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून राज्य तसेच केंद्र सरकारकडून मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, अजूनही स्थिती नियंत्रणात आलेली नाही. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी संपूर्ण मणिपुरमध्ये जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी दुपारी कांगचुप सेक्टरमधील गेल्झांग आणि सिंगडा या परिसरात दोन गटांनी एकमेकांवर तुफान गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हे ही वाचा:
‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट
मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’
पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू
मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी, २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतरची ही पहिली सर्वपक्षीय बैठक असणार आहे. दिल्लीत दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती आणि येथील संघर्षग्रस्त परिस्थिती पूर्ववत करण्याच्या दिशेने या बैठकीत चर्चा होणार आहे.