गोळीबारात हत्या झालेला उत्तर प्रदेशच खासदार आणि गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या बॅनरमुळे बीड जिल्ह्यातील माजलगावात एकच खळबळ उडाली.
शर्ट लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये अतिक आणि अश्रफ या दोघा भावांना शहीद असे संबोधण्यात आले होते. भर चौकात हे बॅनर लावल्याने एकच गोंधळ उडाला. माजलगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी हे बॅनर तात्काळ काढून टाकत या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी सकाळी माजलगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौकात अतीक व अश्रफ भावांचे शहिद म्हणून असल्याचे बॅनर झळकत होते. गँगस्टर अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांच्या हत्येचा निषेध करत ते शहीद झाले असल्याचा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला होता. या बॅनरवर त्यांना स्वर्गात जागा मिळावी, असे लिहिले होते. या बॅनरबाजीची शहरभरात चर्चा सुरु झाली.
बजरंग दलाने या संदर्भात निवेदन देऊन निषेध केला. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. बॅनरमुळे शहरातील वातावरण बिघडू नये हे लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि नगर परिषद प्रशासनाने सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे बॅनर काढून घेतले. याप्रकरणी गेवराई उपविभागीय पोलिस अधिकारी राठोडे चौकशीसाठी दाखल झाले.
हे ही वाचा:
राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार
राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर
अतिक आणि अश्रफ यांच्या पोस्टरप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २९३, २९४ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माजलगाव पोलिसांनी बॅनर लावणारा व छापणारा अशा दोघांनाही ताब्यात घेतले.