नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित घटना ही नवी मुंबईतील वाशीमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिघांनीही शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) रात्री उंदीर मारायचे औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृतकांमध्ये ८७ वर्षीय आई मोहिनी कामवानी, मुलगा दिलीप कामवानी (६७), मुलगी कांता कामवानी (६३) यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’
प्रसिद्ध झाला!! ‘न्यूज डंका’चा पहिलावहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’
विशेष म्हणजे मृतकांनी विषारी औषध घेतल्यानंतर पोलीस कंट्रोल रुमला फोन करत माहिती दिली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले की, २९ ऑक्टोबर रोजी रात्री तिघांनी उंदीर मारण्याचे औषध घेतले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यावर तिघांना वाशीच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र औषध जास्त प्रमाणात असल्याने तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी पाच पानी सुसाईड नोट मिळाली आहे. सध्या आत्महत्या करण्याचा उद्देश काय आणि या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे त्याची चौकशी सुरु आहे.