ताडदेव येथील सुरेखा अग्रवाल (६३) यांची हत्या करून लूट करणाऱ्या लुटारूंपैकी दोघांना राजस्थानमधील झालावार पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तर, या दाम्पत्याची टीप देणारा, त्यांच्याच दुकानामध्ये काम करणाऱ्या सुमित टटवाल यालाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सुरेखा यांचे पती मदन मोहन अग्रवाल (७५) जखमी झाले होते. लुटारूंनी लुटलेले दीड कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेल्या टटवालला बुधवारी सकाळी ताडदेव पोलिसांनी अटक केली.
राजस्थान पोलिसांच्या पथकाने जंगल पिंजून काढून या चोरीचा मुख्य सूत्रधार सुरेंद्र सिंह उर्फ संजू याला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. त्यानंतर झालावाडच्या दुसर्या पथकाने सुरेंद्र सिंहचा साथीदार आणि राजू उर्फ राजा राम मेघवाल या आणखी एक लुटारूला अटक केली. झालावाड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहने लुटीची कबुली दिली आहे. सुरेंद्र सिंह याच्यावर एक वर्षापूर्वी मोठे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याने बारन जिल्ह्यात राहणारा त्याचा मित्र मयूर याच्याशी संपर्क साधला. मयूरने त्याला नवी दिल्लीत सुमीत टटवाल (३७) याला भेटण्यास सांगितले.
टटवाल याने त्यालाही कर्ज फेडण्यात अडचणी येत असल्याचे सिंह याला सांगितले. सुमित टटवाल गेल्या सात महिन्यांपासून मुंबईतील या दाम्पत्याच्या इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला होता. टटवाल हा त्यांचा कौटुंबिक नातेवाइक आहे की नाही, याचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत. टटवाल यांनेच ताडदेवचे दाम्पत्य श्रीमंत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे सिंह याला सांगितले होते. ‘सुमितने या दाम्पत्याच्या रोजच्या दिनक्रमाची माहिती गोळा केली होती. त्यांनी सिंहला हे जोडपे नेमके कोणत्या फ्लॅटमध्ये राहतात, याबाबतही अचूक माहिती दिली होती,’ असे पोलिसांनी सांगितले.
सिह याने त्यांचा लुटीचा कट तडीस नेण्यासाठी राजस्थानमधील राजू आणि विजय या दोघांशी संपर्क साधला. वृद्ध दाम्पत्य ज्या इमारतीत राहत होते, त्या इमारतीची रेकी त्यांनी केली. सिंह आणि त्याचे उर्वरित कर्मचारी जवळपास चार महिन्यांपासून या जोडप्याचे निरीक्षण करत होते. हत्या आणि दरोड्यानंतर, तटवाल याला इतर आरोपींकडून त्याच्या खात्यात पैसे मिळाले.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या पाक क्रिकेट संघाच्या व्हिडीओत इम्रानच होता गायब…
डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे निधन
दिल्लीवरून ‘इंडिया’मध्ये संघर्ष
मुख्यमंत्र्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न कोणाचा?
‘तो आपला कबुलीजबाब सातत्याने बदलतो आहे. काहीवेळा तो म्हणतो की, त्याच्या खात्यात १० हजार रुपये आले. कधी-कधी तो म्हणतो की त्याला १५ हजार रुपये मिळाले. अर्थात, त्याच्या बँक खात्याची तपासणी केल्यानंतर आम्हाला खरे काय ते लवकरच कळेल,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणाच्या खात्याचा वापर करण्यात आला, हेदेखील शोधण्यास मदत होईल. न्यायालयाने त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘टटवाल याची पत्नी आणि मुले राजस्थानमध्ये राहतात. तो मालाड येथे राहात होता. त्याच्यावर काही फौजदारी गुन्हे दाखल आहेत का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘आम्ही त्याची चौकशी करत आहोत आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतरांबद्दल अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असे झोनल पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. तर, आपल्या पत्नीच्या हत्येमुळे हादरलेल्या मदन मोहन यांच्या मुलाने त्यांना त्यांच्या वडाळ्यातील निवासस्थानी नेले आहे.