नायजेरियन टोळीने बँक ऑफ बहरीन आणि कुवेत या मुंबईतील बँकेतून त्यांचा सर्व्हर हॅक करून तब्बल ५.५ करोड रुपये काढले होते. याच प्रकरणाच्या तपासात ग्वालियर पोलिसांनी तीन जणांना शुक्रवारी अटक केली आहे. या तिघांपैकी एक जण शिकवणी वर्गाचा प्रमुख आहे तर इतर दोघे त्याचे विद्यार्थी आहेत. चोरलेल्या पैशांमधून साधारण २२.५ लाख रुपये हे या तिघांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुंबई गुन्हे शाखेने संबंधित प्रकरणाबद्दल माहिती दिली होती असे, पोलीस अधीक्षक अमित संघी यांनी सांगितले.
डिजिटल चोरी १४ आणि १५ ऑगस्टच्या रात्री झाली होती. याचा मुख्य सूत्रधार मार्टिन असून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. मार्टिनच्या चौकशीतून ग्वालियरमधील तिघांची नावे पुढे आली होती. त्याच माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या तिघांपैकी एक जण शिकवणी वर्गाचा प्रमुख आहे आणि इतर दोघे त्याचे विद्यार्थी आहेत. दोन्ही विद्यार्थी १२ वीत असून त्यांना चोरीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ठेवण्यासाठी म्हणून २० हजार देण्यात आले होते, असे संघी यांनी सांगितले. तसेच त्यांना सर्व्हर हॅक प्रकरणाबद्दल माहिती नव्हती केवळ पैसे सांगितलेल्या बँक खात्यात टाकायचे इतकेच काम ते करत असत. अटक केलेल्या तीनही आरोपींना मुंबईत आणण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस
केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण
चोरी केलेली रक्कम तब्बल ८७ बँक खात्यात टाकली गेली. त्यातील तीन बँक खाती ही ग्वालियरमधील तिघांची होती. रवी राजे असे शिकवणी वर्गाच्या प्रमुखाचे नाव असून त्याला सात वर्षापूर्वी एका प्रकरणात इंदोर गुन्हे शाखेने अटक केली होती. रवी हा मुरार परिसरात राहत असून त्याने पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी विषयातून घेतलेले आहे. चार वर्षांपासून बँक भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यासाठीचे शिकवणी वर्ग तो चालवत आहे.
पोलीस सध्या राज नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. राज नावाच्या व्यक्तीनेच या तिघांची नायजेरियन टोळीशी भेट घडवून दिली असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या दोन विद्यार्थ्यांना या प्रकरणाबद्दल जास्त माहिती नाही ते केवळ पैशाच्या आमिषाने काम करत होते. मात्र रवीचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.