सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील तीन पैकी दोन फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुण्यातून घेतलं ताब्यात

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील तीन पैकी दोन फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून याची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी आणि देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा सध्या सीआयडी कोठडीत आहे. तर देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार होते आणि त्यांचा शोध घेतला जात होता. याला आता मोठे यश मिळाले असून तीन पैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या आरोपींचा समावेश आहे.

या प्रकरणी सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले होते, त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

अवाडा एनर्जी यांच्याकडून मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली असून मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात काही कामं आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत लोक वावरत असल्याचं चित्र आहे. याच गुन्ह्यामध्ये ६ डिसेंबरला अवाडा एनर्जीच्या ऑफिसमध्ये अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी गेले होते आणि त्यांनी वॉचमनला शिवीगाळ करत मारहाण केली. सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली.

हे ही वाचा : 

सिडनी कसोटीत न खेळणाऱ्या रोहित शर्माने अखेर घेतला निर्णय!

मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा

दिल्ली झाली ‘गायब’, धुक्यामुळे दिसेनासे झाले

हिंदू साधू चिन्मय दास प्रकरणाची निष्पक्ष चाचपणी व्हावी

यादरम्यान पीडितांनी सरपंचांना संपर्क केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच घटनास्थळी आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पुढे ९ डिसेंबरला संतोष देशमुख चारचाकी वाहनातून गावी परतत होते. ते एकटेच होते पुढे पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले आणि देशमुख त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर देशमुख यांची गाडी पोहचताच त्यांनी गाडी अडवली आणि काच फोडून त्यांना बाहेर काढले. स्कॉर्पिओ गाडीत टाकून त्यांना मारहाण केली. अमानुष मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाला. देशमुख मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Exit mobile version