संभाषणात समोरच्याला गुंतवून ठेऊन हातचलाखीने दागिने लुटणाऱ्या टोळीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ठाण्यातून तिघांना अटक केली असून त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना फसवल्याचे तपासातून उघड झाले आहे. रामलाल चुन्नीलाल राठोड, धर्मा उर्फ बुच्चा गंगाराम सोळंकी आणि शामू देवरस या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
भायखळा येथील एक ६५ वर्षीय महिला मंदिरात दर्शनासाठी जात असताना तीन तरुणांनी त्यांना थांबवले. वेगवेगळी कारणे देऊन त्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्यांनी मोठ्या चलाखीने महिलेकडील तब्बल अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. महिलेने या प्रकरणाबाबत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगांवकर यांनी सहायक निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक अभिजित टेकवडे, गालांगे यांच्यासह मंडलिक, खानविलकर, चारंडे, गोडसे, शिंदे, रणदिवे, खरात यांची पथके तयार करून तपासाला सुरुवात केली.
हे ही वाचा:
लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?
एमओए : मनमर्जी ऑलिम्पिक असोसिएशन
मार्क्सवादी पक्षाला आता पोहोचली जमात ए इस्लामी कट्टरतावादाची झळ
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
पोलिसांनी गुन्ह्याच्या वेळेनुसार महालक्ष्मी ते कुलाबा अशा परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्हीच्या चित्रणाची तपासणी केली. यामध्ये तीन आरोपींनी वेगवगेळ्या ठिकाणी जाण्यासाठी सहा वेळा टॅक्सी बदलल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान आरोपींनी मोबाईलचा वापर केल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेतला, तेव्हा ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील साठे नगरमध्ये लोकेशन आढळले. मात्र, आरोपी कायमचे स्थायिक नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोरील आव्हान होते. त्यामुळे पोलिसांची पथके त्या परिसरात ठाण मांडून होती. अखेर नेहमीप्रमाणे चोरी करून घरी परतत असणारे तीनही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.