भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील गोवंडी परिसरातील ७२ मशिदींमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या भोंग्यांवर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांना फेसबुकवरून धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे.
किरीट सोमय्या यांना युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली आहे. अन्सारी याने ८ एप्रिल रोजी किरीट सोमय्या यांच्या घरी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांचा पत्ता शोधून काढणार आणि आंदोलन करणार. कॉलर पकडून बाहेर काढणार, असा इशारा त्याने दिला आहे. शिवाय गोवंडीमधील मुस्लिमांना त्याने आवाहन केले आहे की, मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी पोलीस आले किंवा आवाज कमी करण्यास सांगितले तर मला संपर्क करा. कोणीही येतं काहीही बोलतं आणि आपण ते पाळायचं का? हा हिंदुस्तान आहे, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार देश चालणार, असा इशारा त्याने दिला आहे.
यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, त्यांची भूमिका स्पष्ट असून ते अशा गुंडांना घाबरत नाहीत. अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाई होणारचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, शिवाजी नगर, गोवंडी पोलिस ठाण्याने अधिकृत दिलेल्या आकडेवारीनुसार ७२ मशिदी आहेत. या प्रत्येक मशीदीवर पाच ते सहा भोंगे आहेत. म्हणजे एकट्या शिवाजी नगर, गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४०० अनधिकृत भोंगे आहेत. मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप येथील ८० टक्के मशिदींनी भोंग्यासाठी परवानगी घेतलेली नाही. मुंबई शहरात चार हजार अनधिकृत भोंगे आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा :
टॅरिफ वॉरमुळे शेअर बाजार गडगडला; जगात काय परिस्थिती?
काही जणांना विनाकारण छाती बडवण्याची सवय!
सूर्य तिलक पाहताच रामभक्त भावविभोर
रामभक्तांवर फुले उधळत इक्बाल अन्सारी काय म्हणाले?
गेल्या अनेक महिन्यांपासून किरीट सोमय्या हे अनधिकृत भोंगे या मुद्द्यावर सक्रिय आहेत. मुंबईतील विविध भागातील मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. सोमय्या यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या आहेत आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.