विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी

आठवड्याभरात १६ विमानांना मिळाल्या धमक्या; सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न

विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी

गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम विमान वाहतुकीवर होत असून सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न उद्भवला आहे. नुकतेच तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. या अशा प्रकराच्या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या घटनांवर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारच्या विघ्नकारी कृत्यांबद्दल चिंता असल्याचं म्हणत या धमक्यांचा निषेध केला आहे. अशातच आणखी दोन विमानांना धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

दोन विमानांना शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. एका आठवड्यात किमान १६ विमानांना अशाच धमक्या मिळाल्या आहेत. बॉम्बच्या धमकीनंतर शनिवारी सकाळी दिल्लीहून लंडनला जाणारे विस्तारा विमान फ्रँकफर्टला वळवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानाची कसून सुरक्षा तपासणी केल्यानंतर कोणताही धोका नसल्याची बाब समोर आली आहे. यानंतर विमानाने त्याचा पुढील लंडनच्या दिशेने प्रवास सुरू केला. दिल्ली-लंडन विस्तारा फ्लाइट फ्रँकफर्ट विमानतळावर सकाळी १२.४० वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरक्षितपणे उतरले आणि अनिवार्य तपासणी करण्यात आली. सुमारे दोन तासांनंतर फ्रँकफर्टहून लंडनसाठी रवाना झाले, असे एअरलाइनने शनिवारी सांगितले.

“दिल्ली ते लंडन १८ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यरत असलेल्या विस्तारा फ्लाइट UK17 ला सोशल मीडियावर सुरक्षेचा धोका प्राप्त झाला. प्रोटोकॉलच्या अनुषंगाने, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले आणि खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकांनी फ्लाइट फ्रँकफर्टला वळवण्याचा निर्णय घेतला,” असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले.

हे ही वाचा : 

ईडीकडून पीएफआयच्या ३५.४३ कोटी किंमतीच्या १९ मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यासह माजी आमदार गुलाब यादव यांना अटक

फतवा निघाला, हिंदू संताची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करा…

महाविकास आघाडीत बिघाडी; जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर

दरम्यान, दुबईहून जयपूरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये १८९ प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. पहाटे १.२० वाजता विमान उतरले आणि तपासणीनंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. तर, शुक्रवारी, बेंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या आकासा एअरच्या विमानाला टेकऑफच्या काही वेळापूर्वी धमकी मिळाली. सर्व प्रवाशांना सुरक्षितता तपासणीसाठी उतरवण्यात आले. मात्र, तपासणीनंतर काहीही आढळून आले नाही.

दरम्यान, छत्तीसगडमधील एका १७ वर्षीय १४ ऑक्टोबर रोजी मुंबईहून निघालेल्या तीन फ्लाइट्सना धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ज्या उपकरणांवरून ही धमकी दिली गेली होती त्यांचे काही आयपी पत्ते लंडनसह परदेशात सापडले होते.

Exit mobile version