विश्वचषक स्पर्धा २०२३ चा रणसंग्राम सध्या भारतात रंगला असून या स्पर्धेला गुरुवार, ६ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. देशातील विविध मैदानांवर हे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी संपूर्ण देश आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली असताना एका ईमेलने खळबळ उडवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची आणि अहमदाबादमधील मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी असल्याचा मेल प्राप्त झाला आहे. यानंतर संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ५०० कोटी रुपये देण्यासह गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सोडण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेकडून म्हणजेच एनआयएकडून मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
“तुमच्या सरकारकडून ५०० कोटी रुपये आणि लॉरेन्स बिष्णोई हवा आहे. नाहीतर मोदी यांच्यासह नरेंद्र मोदी स्टेडीअम उडवण्यात येईल. कितीही सुरक्षा पुरवा आमच्यापासून वाचणार नाही, अशा आशयाचा मजकूर ई मेलमध्ये आहे. तसेच संपर्क साधायचा असेल, तर त्याच ईमेलवर संपर्क साधावा, असे त्यात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस यंत्रणांना धमकीचे निनावी फोन अथवा मेल येण्याचे प्रमाण वाढले असून मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांत खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे ८० हून अधिक खोटे दूरध्वनी आले आहेत. तर दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून खोटी माहिती देत पोलिसांना त्रास दिला होता.
हे ही वाचा:
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स
गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी आला होता. आरोपीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली आणि बोलू दिले नाही तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली होती. त्यानंतर मंत्रालयात तपास केला असताना हा फोन खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते.