राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या मुंबईवर गणेश चतुर्थीच्या तोंडावर संकटाचे ढग गडद होताना दिसत आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत असून ते लवकरच हल्ल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती एका निनावी व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून दिली. यानंतर यंत्रणा त्वरित अलर्ट मोडवर आल्या आहेत. या फोननंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन आल्यानंतर हा फोन आणि या व्यक्तीचा शोध सुरु झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झालं. कॉल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
सध्या राज्यासह मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह असून अनेक मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन सोहळे पार पडत आहेत. शिवाय भाविक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे दादर, बोरिवली अशा उपनगरात बाजार नागरिकांनी फुलले आहेत. त्यामुळे अशा धमकीचा फोन आल्याने यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती.
हे ही वाचा:
हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद
सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !
कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?
‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?
मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा हे कॉल्स फेक असतात. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. तर, ६ ऑगस्ट रोजीही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली होती. त्यानंतर या व्यक्तीला अटक करुन त्याची चौकशी करण्यात आली होती.