उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्राएल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम ऍप्पवर या दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या मेसेजमध्ये बिटकॉईनद्वारे पैशांची मागणी केल्याचाही उल्लेख आहे.
“ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तो सुखरुप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, ‘पिक्चर अभी बाकी है।‘ जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केलं, तेव्हा तुम्ही काही करु शकला नव्हतात. तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली, पण काही झालं नाही. (अंबानींना उद्देशून) तुम्हाला माहित आहे, की काय करायचं आहे. तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा.” असा मेसेज टेलिग्राम ऍप्पवर लिहिण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. अँटालिया बंगल्याबाहेर एक महिन्यांपर्यंत संदिग्ध व्यक्तींनी रेकी केली होती. तसेच अंबानींच्या ताफ्याचा अनेक वेळा पाठलागही केला होता. या कारमध्ये २० नंबर प्लेटही आढळून आल्या आहेत. यातील अनेक नंबर्स हे अंबानींच्या ताफ्यातील कारच्या नंबरशी मिळते जुळते आहेत. बंगल्याबाहेर सापडलेल्या कारपाठोपाठ एक इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून याच कारमधून रेकी केली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्या शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कार पार्क करतानाही दिसत आहे. मात्र फेस मास्कमुळे त्याची ओळख पटण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.