…म्हणून झाली प्रदीप शर्मांना अटक

…म्हणून झाली प्रदीप शर्मांना अटक

एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हत्या प्रकरणाशी प्रदीप शर्मा यांचा संबंध आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनी दिलेल्या जबाबामुळे शर्मा अडचणीत आले आहे.

संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना ११ जून रोजी अटक केल्यानंतर शर्मा यांचा थेट संबध असल्याचे या दोघांच्या चौकशीत समोर आले आहे. या दोघांपैकी अटक करण्यात आलेला संतोष शेलार हा शर्मा यांचा निकटवर्तीय मानला जातो. तर शर्मा यांचा व्यवसाय देखील संतोष शेलार बघत होता अशी माहिती समोर येत आहे. शर्मा यांच्या वाढदिवसाचे बॅनर्सही त्यांनी लावले होते. तर त्याचे प्रदीप शर्मा यांच्या सोबतचे फोटोसुद्धा आढळून आले आहेत. तर आनंद जाधव हा लखनभैया फेक एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अटकेत असलेल्या आनंद जाधव याने न्यायालयात थेट प्रदीप शर्मा यांचे नाव घेतल्यामुळे एनआयएच्या तपासाला वेग आला.

गुरुवार सकाळी एनआयएच्या पथकाने लोणावळ्यातून प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेतले. मुंबईतील अंधेरी भागातील शर्मा यांच्या निवासस्थानाची एनआयएकडून तब्बल सहा तास झडती घेण्यात अली. तर शर्मा यांचीही पुन्हा एकदा या प्रकरणात चौकशी करण्यात आली. या आधी दोन वेळा शर्मा यांची एनआयए मार्फत चौकशी करण्यात आली होती.

शर्मा यांच्या घराची झडती घेत असतानाच एनआयएच्या हाती काही सबळ पुरावे लागल्याची माहिती समोर येत आहे. या पुराव्यांच्या आधारेच शर्मा यांना अटक करण्यात आल्याचे समजत आहे. अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणातील ही ८ वी अटक आहे. शर्मा यांना अटकेत घेतल्यानंतर त्यांच्या व्यवसायिक कार्यालयाची तसेच त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाचीही झडती एनआयएकडून घेतली जात आहे.

दरम्यान शर्मा यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे. रुग्नालयात नेण्यात आले होते. तर ही चाचणी झाल्यावर शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात प्रदीप शर्मा यांना हजर करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालय आता शर्मा यांना किती दिवसांची कोठडी सुनावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही

शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती निवडणुकीपूर्वीचीच

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या स्वरा भास्कर विरोधात तक्रार दाखल

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

या प्रकरणाशी संबंधित ठाण्यातील एक अधिकारीही एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे. या अधिकाऱ्याला देखील लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version